आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
तिलका मांझी ( Tilaka Manjhi ) ह्यांना त्यांच्या शहादत दिना निमित्त ( १३ जानेवारी ) हूल जोहार , विनम्र अभिवादन......
✒️डॉ.संजय दाभाडे सर , पुणे 9823529505 Dr. Sanjay Dabhade Sir
पुणे:- १३ जानेवारी १७८५ रोजी तिलका मांझी ( Tilaka Manjhi ) ह्यांना वडाच्या झाडाला लटकावून भर चौकात फाशी देत इंग्रजांनी मारलं. ते अवघ्या ३५ वर्षांचे आदिवासी युवक होते ( त्यांचा जन्म ११ फेबृअरी १७५० ).
तिलका ( Tilaka Manjhi ) हे इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे पहिले शहीद होते. असे असूनही तिलका मांझी ( Tilaka Manjhi ) ह्यांच्या शहादत नंतर ४२ वर्षांनी जन्म झालेल्या मंगल पांडे ( जन्म १९ जुलै १८२७ ) ह्यांना इतिहासकारांनी पहिले भारतीय क्रांतिकारक व शहीद म्हणून स्थान दिले. आम्ही आमच्या पाठ्य पुस्तकांत नेहमी मंगल पांडे वाचले पण आम्हाला तिलका मांझी भेटलेच नाहीत आमच्या इतिहासाच्या पानांमध्ये.
असं का झालं असेल ह्याचं उत्तर स्पष्टच आहे. इथं एका विशिष्ट वर्गाचे सांकृतिक प्रभुत्व राहिले व त्यांनी त्यांच्या सोयीचा इतिहास शोधला नि लिहिला. त्यातून पुन्हा स्वताचेच वर्चस्व अबाधित राहील अशी व्यवस्था केली गेली व इथल्या तळागाळातील समाजाला अव्हेरले गेले , नाकारले गेले.
तिलका मांझी ( Tilaka Manjhi ) इंग्रजांच्या विरुद्ध लढलेच परंतु आदिवासींच्या वर अत्याचार करणाऱ्या देशी दिकू विरुद्ध देखील ते लढले....जंगल व जमिनीच्या बचावासाठी लढले. तेही कारण असावे त्यांना नजरेआड केले जाण्याचे. तिलका म्हणजे लाल डोळे नि संतप्त झालेले....इंग्रजांनीच त्यांना तिलका नाव दिले. मांझी म्हणजे गावाचे प्रमुख , मुखिया. तिलका मांझी ह्यांना जबरा पहाडिया देखील म्हटलं जाई.
त्यांनी ( Tilaka Manjhi ) भागपुर च्या अत्याचारी कलेकटर क्विवलंद ह्यास ठार केलं . अश्या ह्या तिलका मांझी ह्यांची शहादत इथं झाकून नि लपवून ठेवण्यात आली नि त्यामुळे आमच्या पिढीला ते कळण्यात मोठा काळ जावा लागला. आमचा इतिहास समजून घेण्यासाठी आम्हालाच धडपड करावी लागते, गाडलेले ढिगारे उपसून काढणे भाग पडू लागले.
ह्या अस्मिता म्हणून कुणी आता आम्हालाच दोषी ठरवू लागेल पण ह्या अस्मिता आमचं अस्तित्व नाकारल्या गेल्यामुळेच उभ्या राहताहेत हे समजून घ्यावे लागेल.
स्थानिक आदिवासींनी मात्र तिलका ह्यांचा इतिहास लोकगीतांत जिवंत ठेवला आहे. महाशेवता देवी ह्यांनी तिलका मांझी ह्यांच्यावर लिहिले आहे. भागलपूर इथं तिलका मांझी ह्या नावाची शिक्षण संस्था आहे. तसेच झारखंड येथील दुमका इथे त्यांची मोठी प्रतिमा देखील आहे.
♦️ डॉ.संजय दाभाडे , पुणे
9823529505 sanjayaadim@gmail.com

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार